Tuesday 28 November 2017

प्रेम व्यक्त करताना 30


"आपण आता बोलत नाही आहे सध्या.."
मला माहित आहे, हे वाक्य वाचल्यावर तू म्हणशील मी  नाही, तू बोलत नाही आहे सध्या.!'
हो अरे, मीच नाही बोलत आहे!

कदाचित तेच बरोबर आहे !

तुला माहित आहे 'प्रेम व्यक्तं करताना 'चा शेवट शोधत होती मी..!
आणि शेवट सापडला. प्रत्येक प्रेम व्यक्तं करतानाच्या लेखातच  "खोटंही धड बोलता नाही येत मला ".

तुझी माझी गोष्ट जुनी झाली आता..! हा पूर्ण प्रवासच खोटा होता.! फक्त माझ्या एकटीचा होता, यात तू कधीच नव्हता एक मित्र म्हणूनही नाही. आणि हीच गंमत आहे.  मागचे सर्व लेख वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ज्यात तू कधीच नव्हता  त्यासाठी तुला माझा राग, संताप, तिरस्कार, द्वेष, उपकार वगैरे कितीतरी सहन करावे लागले ! प्रत्येकदा ' प्रेम व्यक्त करताना ' तुला कुठेतरी मोठा टोमणा द्यायचा, तुला वेदना द्यायचा हेतू होता, पण तू सर्व सहन केलं, जाणीवपूर्वक माझे शब्दं..!  कदाचित तुला फरक पडला नसेल कधीच माझ्या तुझ्यावर लिहिण्याचा.! पण मला शेवटी माझी समजून तू हे सर्व सहन केल माझ्यासाठी हि करायची आहे.!  आणि नसेलही केल तरी निदान तू सर्व प्रेम व्यक्तं करताना वाचलेत तरी ना !!

आपले मार्ग एक नव्हतेच , आपण खूप विभिन्न मानसिकतेचे प्रवासी आहोत हे कळून वळायला मी खूप वेळ घेतला ! पण त्यादिवशीचा एक कटाक्ष (नको जरा हलका शब्दं वापरते प्रेमाचा लेख आहे ना ?)  त्यादिवशीची एक नजरभेट हि जाणीव करून गेली आणि त्या क्षणी सर्व विचारांना पूर्णविराम लागला !
'आपण ' असं काही कधीच नव्हतेच, फक्त मी होती..! सरतेशेवटी माफी मागायची आहे, तुझ्या झालेल्या सर्व त्रासासाठी, वेदनेसाठी !!  तू माफ कर - नको करू ! तुझा प्रश्न आहे..!  मला ' प्रेम व्यक्त करताना ' चा शेवट मिळाला मी त्यातच खुश आहे..!
...वैष्णवी..
#प्रेम_व्यक्त_करताना

Monday 20 July 2015

प्रेम व्यक्त करताना 29

त्याचा ई-मेल:

“निखील मला सांगत होता कि तुला शंका आहे कि मला तुझ्याबद्दल feelings आहेत. सर्वात आधी तर मला feelings काय ते clr करू देत..!

हो, जसं एका जवळच्या मित्रा वर असतं तसं प्रेम आहे मला पण ते बाकी जवळच्या मित्रांवर पण आहेच भलेही कमी जास्त प्रमाणात, आणि लग्न वैगेरे च प्रेम नाहीये “सध्या तरी”. सध्या तरी यासाठी कारण पुढे काय होईल हे मला आणि तुलाही माहिती नाही. प्रत्येक प्रेम सेक्स आणि लग्नात संपत नाही.

माझ्या प्रेमाच्या संकल्पना तुला पटणार नाही म्हणून त्यांवर बोलणारच नाही. आणि कदाचित मी सध्या ज्या दृष्टीने ह्या सगळ्या कडे बघतो त्यासाठी अजून तरी नाही. म्हणजे तुला मला सगळे प्रोब्लेम्स सांगावेसे वाटतात, बोलावं वाटते, शेअर करावसे वाटते, पण त्या सगळ्यात तूच असते नेहमी, मी कधीच नसतो, म्हणजे तू स्वत: होऊन तसं कधी विचारालाही नाही आणि विचारलही असेल तरी तू मला काहीतरी मोठा म्हणून बघते - ज्याला प्रोब्लेम्स आले तरी solve करेल मग सांगून,विचारून,बोलून काय फायदा वैगेरे...

थोडक्यात, आपलं छान जमत, तुला माझ्या बद्दल बरच भाकीत करता येतं, मलाही बोलल्यावर छान वाटत वैगेरे.. वैगेरे.. वैगेरे..  पण हेच सर्व गरजेच नाहीये, याही पेक्षा वर काहीतरी असत असं मला वाटत.. ते काही फार दैवी वैगेरे असते असं काही नाही.. असो, माहिती नाही हे सर्व तुला पटेल कि नाही पण हो मी प्रेमाकडे अशाच दृष्टीने बघतो..

माझी छान मैत्रीण तू आहेच,

थोडक्यात, तुझ्या शंकेवर माझं उत्तर –“सध्या तरी नाही””
   


तिचा ड्राफ्ट मध्येच सेव्ह राहिलेला रिप्ल्याय:


“सध्या तरी नाही”..!!  माझ्या नेमक्या भावना माहिती असतानाही हे अशे उत्तर..!! आता तरी शब्द जपून वापरायचे असते, आधीच तुझ्या शब्दांनी मी घायाळ झाली आहे, तू दिलेल्या जखमा सर्वाना सांगताही येत नाहीत आणि त्या झाकताही येत नाही..!! अश्या द्विधा मन:स्थितीत तू मला मदत करायची सोडून आणखीनच बुचकळ्यात टाकले आहेस..!! तुझ्या ‘सध्या तरी नाही’ ने फक्त शंका कुशंकाचे वावटळ निर्माण केले आहे..!!

मला आजही तुझ्याकडून होकार अपेक्षित नव्हता आणि पुढेही कुठलही उत्तर अपेक्षित नाही..!! सध्या तरी नाही च्या ऐवजी कधीच नाही ची ग्वाही दिली असती तर कदाचित ह्या जखमा भरायला मदत तरी झाली असती..!!

तुझ्या प्रेमाच्या संकल्पना, आणि त्या काही फार वेगळ्या नाहीत, फक्त कदाचित माझ्या संकल्पना तुला समजल्या नसतील म्हणून तू इतके स्पष्टीकरण देत असावा हे मी गृहीत धरत आहे..!!


बाकी कुठल्याही बाबीवर बोलायचे नाहीये मला, फक्त “सध्या तरी नाही पेक्षा कधीच नाही” म्हणाला असतास तर सुकून मिळाला असता एवढेच..!!”

Wednesday 6 August 2014

प्रेम व्यक्त करताना २८

"प्रेम लपवायला हवे होते का मी? प्रेम व्यक्त केल्यानी, नकळत एक दुराव्याची भिंत बांधली गेली आहे. भेटायच्या आधी आतुरता आणि भेटल्यावर जीवघेणी शांतता. बरेच प्रश्न पडलेत मला ह्या भेटी नंतर.! बरेच झाले भेटलोत, शांतता शेअर केली आणि ही शांतता खुप जीवघेणी वाटली - नकोशी वाटली. दोन-तिनदा तर तिथून उठून घरी परत जावेसे वाटले, का वाटले ते माहिती नाही, तुझ्याकडून तर काही अपेक्षा पण ठेवली नव्हती, तू भेटायला येणेही मला धक्काच होता.

या वेळी भेटताना माझ्यातली मी ती नव्हती जी तुझ्या प्रेमात पडली होती. जे बघू तेच दिसतं, प्रत्येकदा तुझ्यात प्रेम शोधायची आणि कदाचित ते दिसायचही. पण आता जे समोर होते तेच बघीतले, जो तू होता तोच दिसला, अगदीच शुष्क वाळवंटा सारखा..!

या भेटीनंतर मनापासून वाटले, मला वाळवंट कसा आवडू शकतो? खरचं माझे तुझ्यावर प्रेम होते का.? की फक्त प्रवाहात वाहुन जाताना मी आकर्षणाला प्रेम समजली.? काही दिवस खरच प्रेम काय हे समजून प्रेम व्यक्त करायला हवे होते का? पण प्रेम अनुभव न घेता समजतं का.? माझं-तुझ्यावर प्रेम नाही हे तरी खरं आहे का? प्रेम असतं तर, मी, माझे शब्द, माझी नजर आणि आपल्यातली शांतताही इतकी शुष्क जीवघेणी वाटली असती का? तेव्हा प्रेम लपवले असते तर मला आज पुन्हा नव्याने प्रेमाचा शोध घ्यावासा वाटला असता का.? प्रेम तरी शोधल्यानी सापडतं का.? आणि सापडलं तेच प्रेम असते हे तरी कशावरुन.?

सांग कधी तरी, मी प्रेम लपवायाला हवे होते का.?"

Tuesday 17 June 2014

प्रेम व्यक्त करताना २७

कूठेतरी दूर डोंगरावर पाउस पडला असेल. मला त्या पावसाचा सुगंध स्वतःमध्ये सामावून घ्यावा वाटला..! ही तर साधी सुरवात आहे, पाउस आणि पावसाची श्रृंखला आणखी बरीच दूर आहे.
पण हा असा दूरून आलेला सुगंध का जाणे मनाला भूरळ लावतो..!
जीव पुरता गुंतवतो..!
हवीहवी वाटणारी तुझी-माझी भेट मनात रंगवतो..! आणि प्रत्येकदा हा सुगंध नवीन जखम उलगडतो..

दिवस बदलत जातात, आपण बदलत जातो, आपले विचार बदलत जातात, नियतीचा खेळही बदलत जातो. हा खेळ खेळायचा आपण टाळता म्हणता टाळू शकत नाही. मग हा खेळ खेळताना आपण ठेचाळतो, पडतो, जखम होते, जखमाही होतात. काही ठिक होतात, काही ठिक झाल्या असं वाटतं पण नंतर डोकं वर काढतात..
आणि ज्या कधीच ठीक होत नाहीत त्यावर आपण
काळ नावाचे औषध शोधतो आणि त्याच्या परीणामाची वाट बघत असतो..

प्रेम अशीच एक जखम आहे, नाही का..?

काळ नावाचे औषध काम करणार हे माहीत असतानाही  थोड्या थोड्या वेळानी ही जखम बरी झाली की नाही याची खात्री केली जाते..

प्रेम म्हणजे जखम आहे..!
हवीहवी वाटणारी..!
तीचे वळही हसत हसत ह्रृदयावर घेतले जातात अशी सुगंधी जखम- प्रेम..!

Thursday 29 May 2014

प्रेम व्यक्त करताना २६

एक क्षण भाळण्याचा..!!
आणि बाकीचा सारा काळ स्वतःला सांभाळण्याचा..!!
तसंच काहीसं माझ्याबाबतीत झालं-


ती दिसते कशी.? ती राहते कशी.? ती बोलते कशी.? ती वावरते कशी.? ह्या साऱ्या गोष्टींचा विचार करण्याची मला मुळात कधी गरजच वाटली नाही. खर तर हा विचार करायला काहीतरी "शक्यता" असायला हव्यात..!! मी माझ्या सर्व शक्यता माझ्या खिडकीतून दिसणाऱ्या आभाळावर बांधून ठेवल्या होत्या, त्या आभाळाला बाहेरून आलेली ‘ती’ स्वत:मध्ये सामावून घेणे शक्य नव्हते.!! शक्यता कुठली असली तरी ती चाचपूनही पहावे अशेही मला कधी वाटले नाही..!!

कधी अगदीच आतुरतेने तिची वाट बघणंआपण होऊन काहीतरी काम काढून तिला भेटणं... असं कधी माझ्याकडून झालं नाही!! याचा अर्थ मी तिला टाळायचो असा होत नाही..!! फक्त मी माझा रेड सिग्नल कधी बंद पडू दिला नाही इतकंच..!!

तिला अधूनमधून बोर झालं,कि ती बोलवायची भेटायला, बऱ्याचदा टाळायचो पण आवडायचं मला तिच्याशी बोलायला म्हणून कधी भेटायचोही..!!
 तिला भेटलो कि तिच्या आवाजात आनंद असायचा, नाही म्हणालोच कधी तर नाराजी स्पष्ट दिसायची.. मनात जे आहे ते चेहऱ्यावर स्पष्ट दाखवायच्या तिच्या अदाकारी मुळेच असेल कदाचित तिच्यातलं माझ्यासाठीच प्रेम मला खटकत गेलं..!!
 सुरवातीला खूप प्रयत्न केला नेमकं तिचं मन माहिती करायचा..!! किती निर्हेतुक भाव होते ते आज कळतंय..!! पण तेव्हा मी तिला फटकारलं..!!
त्यानंतर ती कधीच माझ्या वाटेत आली नाही.. तिनी तिच्या सर्व वाटा वेगळ्या केल्या.. माझा अंदाजही तिनी कधी घेतला नाही..! आयुष्यात जुन्या गोष्टींची झालेली जखम घेऊन कशे जगायचे याचे उत्तम उदाहरण झाली ती..!! माझ्या फटकारण्या नंतर ती काल पर्यंत दिसली नाही..!!
काल..
दिसली अचानक..!! मी ओळख दाखवण्यासाठी हसलोही.. पण ती तशीच पुढे निघून गेली..!! बघितलेच नाही का..?? नाहीतर ओळख न दाखवून गेली नसती..!! 
आणि तेव्हाच.. 
तिच्यावर.. 
कधी जिला फटकारले तिच्यावर.. 
मी भाळलो..!!
तेव्हापासून स्वत:ला सांभाळतो आहे..!!



Thursday 15 May 2014

प्रेम व्यक्त करताना २५

“माझा मार्ग बरोबर वाटतोय का तुला..??” डोळ्यातले पाणी कसेबसे लपवत तिनी आज मला प्रश्न विचारला, तशी तिची आणि माझी ओळख फार जुनी नव्हती, काही पाच-सहा वर्ष झाली असतील, पण ती ओळख घट्ट मात्र झाली होती..! तिचा मार्ग मला चुकीचा वाटतोय इतकं स्पष्ट सांगण्यापर्यंत तरी मी तिचा चांगला मित्र नक्की होतो. पण आज तिची मन:स्थिती माझं स्पष्ट मत ऐकण्याची नसावी कदाचित..!!

एरव्ही मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट, हरेक सल्ला, प्रतिप्रश्न न विचारता निमुटपणे ऐकणारी ती आज मात्र वेगळी होती..

आज पहिल्यांदा तिला वाटले कि मी सांगतोय ते चुकतंय, आज तिरस्कारने तिनी विचारले, “तू पडलास कधी प्रेमात..?? किंवा पाडला तरी गेलाय का..??”

तेव्हा चिडून तिला उत्तर द्यायची खूप इच्छा होती कि, “ज्याच्या प्रेम आहेस या भ्रमात आहे त्याला कवडीचीही या गोष्टीची भनक नाहीये..!! ज्या प्रेमाच्या नावाखाली तू स्वत: आयुष्यात उद्वस्त व्हायच्या मार्गी लागली, ते खरच प्रेम आहे का..?? हा प्रश्न एकदा तरी स्वत:ला विचार..!”
“प्रेम.. प्रेम म्हणून तुझी मुल्ये गहन ठेवलीस तू.. ज्याला फिकीर नाही त्याच साठी झुरत आहे तू..??”

“मान्य आहे प्रेमात पडलो नाहीये मी..!!! आणि कुणी धक्का देऊन पाडावे इतका माझा तोलही तुझ्यासारखा जाऊ दिला नाहीये मी..! पण प्रेमात तुझ्या डोळ्यात जे दुख: दिसत आहे तेच मिळणर असेल तर प्रेमात पडायचंच नाहीये मला”, तिला रागावून खडकावून हे सांगायचं होत मला..!!

पण तिच्या डोळ्यातलं पाणी सांगत होत कि आज मी काहीही बोललो तरी ती ते समजून घेऊच शकणार नाही..!! तिच्या हो-त-हो मिळविणेच  योग्य होते..!! तिला खरं तर सांत्वनाची गरज नव्हती फक्त तिच्या असलेल्या भावना चुकीच्या नाहीत हे प्रेमानीच समजावण्याची गरज होती..!! तिला फक्त एक मित्र म्हणून माझी मदत हवी होती..!


प्रेम व्यक्त करताना २४

नेहमीप्रमाणे सिग्नल लागायच्या आधी बाईक काढावी म्हणून स्वप्नील वेगात होता. पण लाल लाईट आणि त्याच सोबत त्याच्या वेगाला ब्रेक लागला..!! तसा तो नजर टाळत होता पण न राहवून बाजूच्या गाडीवर नजर गेली..

MH.. आणि त्यानंतरचे अंक डोळ्यानी भरकन वाचून त्यांनी तिला बघितलं..!! आणि उडालाच..!! ती..?? तीच..!! नम्रता..!! गोंधळला..!! आनंदला..!! गडबडला..!!

गालांवर ओघळणारे केस सावरताना आजही तिचा गोंधळ उडतो..!! तेच पाणीदार डोळे..!! आणि आपल्याला कुणीही कितीही पहात असेल तरीही त्याच्याकडे न पाहण्याचा अट्टहास तोच..!!

त्याला त्याचे आश्चर्य वाटले, दोन वर्ष झाले असतील..!! त्यानी valentine ला प्रो मारला होता..!!तेव्हा सर्व मित्रांसमोर त्याच्यासाठी तिनी ती फुले घेतली तर खरी, पण त्या नंतर त्याला एकट्यात पकडून काय जबरदस्त कान उघडली केली होती..!!! 

तिची आणि त्याची प्रेमाची संकल्पना वेगळी-वेगळी होती. त्याला ती आवडायची, प्रेम करायचा तो तिच्यावर..!! पण ती प्रेमाला काहीतरी भानगड समजायची..!! प्रेम वैगेरे काही माझ्यासाठी नाहीच हाच समज ती नेहमी बाळगायची..!! तिनी नाही म्हटलं आणि तो मागे सरला..!! नंतर फक्त ओठांवर हसून ओळख द्यावी एवढीच त्यांची ओळख होती..!!

तीच नम्रता..!! दोन वर्षा नंतर अशी सिग्नल वर ती त्याच्या समोर होती..!!

तिलाही कळत होते मगापासूनच कुणीतरी आपल्याला बघत आहे पण तिचा अट्टहास, ती वळून त्याच्याकडे बघणारच नाही..!!

तो मात्र तिला शून्यात हरवल्या सारखा बघत होता. आताही आवडते का मला ती..?? अजूनही प्रेम करतो का तिच्यावर..?? स्वत:च स्वत:ला विचारत होता..!! तिची तंद्री लागली होती त्याला..!!

मागच्या किर्र हॉर्न नी तो जागा झाला, सिग्नल सुटला होता,ती पुढे निघून गेली होती. आता त्याच्याही बाईक ने वेग घेतला..!!


सिग्नल सुटल्यावर तिनी मात्र गाडीच्या आरशातून आपल्याला पाहणाऱ्या त्याचा चेहरा पहायला विसरली नाही..!! ओळखीचा वाटतोय खरा तो..!! पण कोण..?? तिच्याही विचारांनी वेग घेतला..!!