Thursday, 29 May 2014

प्रेम व्यक्त करताना २६

एक क्षण भाळण्याचा..!!
आणि बाकीचा सारा काळ स्वतःला सांभाळण्याचा..!!
तसंच काहीसं माझ्याबाबतीत झालं-


ती दिसते कशी.? ती राहते कशी.? ती बोलते कशी.? ती वावरते कशी.? ह्या साऱ्या गोष्टींचा विचार करण्याची मला मुळात कधी गरजच वाटली नाही. खर तर हा विचार करायला काहीतरी "शक्यता" असायला हव्यात..!! मी माझ्या सर्व शक्यता माझ्या खिडकीतून दिसणाऱ्या आभाळावर बांधून ठेवल्या होत्या, त्या आभाळाला बाहेरून आलेली ‘ती’ स्वत:मध्ये सामावून घेणे शक्य नव्हते.!! शक्यता कुठली असली तरी ती चाचपूनही पहावे अशेही मला कधी वाटले नाही..!!

कधी अगदीच आतुरतेने तिची वाट बघणंआपण होऊन काहीतरी काम काढून तिला भेटणं... असं कधी माझ्याकडून झालं नाही!! याचा अर्थ मी तिला टाळायचो असा होत नाही..!! फक्त मी माझा रेड सिग्नल कधी बंद पडू दिला नाही इतकंच..!!

तिला अधूनमधून बोर झालं,कि ती बोलवायची भेटायला, बऱ्याचदा टाळायचो पण आवडायचं मला तिच्याशी बोलायला म्हणून कधी भेटायचोही..!!
 तिला भेटलो कि तिच्या आवाजात आनंद असायचा, नाही म्हणालोच कधी तर नाराजी स्पष्ट दिसायची.. मनात जे आहे ते चेहऱ्यावर स्पष्ट दाखवायच्या तिच्या अदाकारी मुळेच असेल कदाचित तिच्यातलं माझ्यासाठीच प्रेम मला खटकत गेलं..!!
 सुरवातीला खूप प्रयत्न केला नेमकं तिचं मन माहिती करायचा..!! किती निर्हेतुक भाव होते ते आज कळतंय..!! पण तेव्हा मी तिला फटकारलं..!!
त्यानंतर ती कधीच माझ्या वाटेत आली नाही.. तिनी तिच्या सर्व वाटा वेगळ्या केल्या.. माझा अंदाजही तिनी कधी घेतला नाही..! आयुष्यात जुन्या गोष्टींची झालेली जखम घेऊन कशे जगायचे याचे उत्तम उदाहरण झाली ती..!! माझ्या फटकारण्या नंतर ती काल पर्यंत दिसली नाही..!!
काल..
दिसली अचानक..!! मी ओळख दाखवण्यासाठी हसलोही.. पण ती तशीच पुढे निघून गेली..!! बघितलेच नाही का..?? नाहीतर ओळख न दाखवून गेली नसती..!! 
आणि तेव्हाच.. 
तिच्यावर.. 
कधी जिला फटकारले तिच्यावर.. 
मी भाळलो..!!
तेव्हापासून स्वत:ला सांभाळतो आहे..!!



Thursday, 15 May 2014

प्रेम व्यक्त करताना २५

“माझा मार्ग बरोबर वाटतोय का तुला..??” डोळ्यातले पाणी कसेबसे लपवत तिनी आज मला प्रश्न विचारला, तशी तिची आणि माझी ओळख फार जुनी नव्हती, काही पाच-सहा वर्ष झाली असतील, पण ती ओळख घट्ट मात्र झाली होती..! तिचा मार्ग मला चुकीचा वाटतोय इतकं स्पष्ट सांगण्यापर्यंत तरी मी तिचा चांगला मित्र नक्की होतो. पण आज तिची मन:स्थिती माझं स्पष्ट मत ऐकण्याची नसावी कदाचित..!!

एरव्ही मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट, हरेक सल्ला, प्रतिप्रश्न न विचारता निमुटपणे ऐकणारी ती आज मात्र वेगळी होती..

आज पहिल्यांदा तिला वाटले कि मी सांगतोय ते चुकतंय, आज तिरस्कारने तिनी विचारले, “तू पडलास कधी प्रेमात..?? किंवा पाडला तरी गेलाय का..??”

तेव्हा चिडून तिला उत्तर द्यायची खूप इच्छा होती कि, “ज्याच्या प्रेम आहेस या भ्रमात आहे त्याला कवडीचीही या गोष्टीची भनक नाहीये..!! ज्या प्रेमाच्या नावाखाली तू स्वत: आयुष्यात उद्वस्त व्हायच्या मार्गी लागली, ते खरच प्रेम आहे का..?? हा प्रश्न एकदा तरी स्वत:ला विचार..!”
“प्रेम.. प्रेम म्हणून तुझी मुल्ये गहन ठेवलीस तू.. ज्याला फिकीर नाही त्याच साठी झुरत आहे तू..??”

“मान्य आहे प्रेमात पडलो नाहीये मी..!!! आणि कुणी धक्का देऊन पाडावे इतका माझा तोलही तुझ्यासारखा जाऊ दिला नाहीये मी..! पण प्रेमात तुझ्या डोळ्यात जे दुख: दिसत आहे तेच मिळणर असेल तर प्रेमात पडायचंच नाहीये मला”, तिला रागावून खडकावून हे सांगायचं होत मला..!!

पण तिच्या डोळ्यातलं पाणी सांगत होत कि आज मी काहीही बोललो तरी ती ते समजून घेऊच शकणार नाही..!! तिच्या हो-त-हो मिळविणेच  योग्य होते..!! तिला खरं तर सांत्वनाची गरज नव्हती फक्त तिच्या असलेल्या भावना चुकीच्या नाहीत हे प्रेमानीच समजावण्याची गरज होती..!! तिला फक्त एक मित्र म्हणून माझी मदत हवी होती..!


प्रेम व्यक्त करताना २४

नेहमीप्रमाणे सिग्नल लागायच्या आधी बाईक काढावी म्हणून स्वप्नील वेगात होता. पण लाल लाईट आणि त्याच सोबत त्याच्या वेगाला ब्रेक लागला..!! तसा तो नजर टाळत होता पण न राहवून बाजूच्या गाडीवर नजर गेली..

MH.. आणि त्यानंतरचे अंक डोळ्यानी भरकन वाचून त्यांनी तिला बघितलं..!! आणि उडालाच..!! ती..?? तीच..!! नम्रता..!! गोंधळला..!! आनंदला..!! गडबडला..!!

गालांवर ओघळणारे केस सावरताना आजही तिचा गोंधळ उडतो..!! तेच पाणीदार डोळे..!! आणि आपल्याला कुणीही कितीही पहात असेल तरीही त्याच्याकडे न पाहण्याचा अट्टहास तोच..!!

त्याला त्याचे आश्चर्य वाटले, दोन वर्ष झाले असतील..!! त्यानी valentine ला प्रो मारला होता..!!तेव्हा सर्व मित्रांसमोर त्याच्यासाठी तिनी ती फुले घेतली तर खरी, पण त्या नंतर त्याला एकट्यात पकडून काय जबरदस्त कान उघडली केली होती..!!! 

तिची आणि त्याची प्रेमाची संकल्पना वेगळी-वेगळी होती. त्याला ती आवडायची, प्रेम करायचा तो तिच्यावर..!! पण ती प्रेमाला काहीतरी भानगड समजायची..!! प्रेम वैगेरे काही माझ्यासाठी नाहीच हाच समज ती नेहमी बाळगायची..!! तिनी नाही म्हटलं आणि तो मागे सरला..!! नंतर फक्त ओठांवर हसून ओळख द्यावी एवढीच त्यांची ओळख होती..!!

तीच नम्रता..!! दोन वर्षा नंतर अशी सिग्नल वर ती त्याच्या समोर होती..!!

तिलाही कळत होते मगापासूनच कुणीतरी आपल्याला बघत आहे पण तिचा अट्टहास, ती वळून त्याच्याकडे बघणारच नाही..!!

तो मात्र तिला शून्यात हरवल्या सारखा बघत होता. आताही आवडते का मला ती..?? अजूनही प्रेम करतो का तिच्यावर..?? स्वत:च स्वत:ला विचारत होता..!! तिची तंद्री लागली होती त्याला..!!

मागच्या किर्र हॉर्न नी तो जागा झाला, सिग्नल सुटला होता,ती पुढे निघून गेली होती. आता त्याच्याही बाईक ने वेग घेतला..!!


सिग्नल सुटल्यावर तिनी मात्र गाडीच्या आरशातून आपल्याला पाहणाऱ्या त्याचा चेहरा पहायला विसरली नाही..!! ओळखीचा वाटतोय खरा तो..!! पण कोण..?? तिच्याही विचारांनी वेग घेतला..!!  

प्रेम व्यक्त करताना २३


ती: तुला माहित आहे..??
तो: काय..??

ती: तू एक मोठा गैरसमज बाळगला आहेस..!!
तो: मी..?? कुठला..??

ती: नक्की सांगू..??
तो: बघ सांगून..!! गैरसमज नसेल तो हे पटेल तुला नंतर आपोआपच..!!

ती: गैरसमज कुठला हे ऐकायच्याच आधीच मलाच गैरसमजीत टाकलस..!!  
तो: नाही तसं नाही..! बोल तू..!!

ती: मी “तुझ्यावर प्रेम करते” हे तुला कधीच म्हटलं नाही..!!
तो: तू “मी आवडतो” हे म्हटलेलं..!!

ती: आवडणं आणि प्रेम करण यात गुंतल्या गेलोय आपण..!!
तो: आपण नाही तू..!!

ती: तोच तुझा गैरसमज झालाय..!!
तो: म्हणजे..??

ती: मी आवडते म्हटल्यावर तू तो चुकीच्या अर्थानी घेतलास..!!
तो: नाही मी काही चुकीचा घेतला नाही..!!

ती: कारण आवडते तर मी तुलाही,पण तुझ आवडणं मी त्याच अर्थानी घेतलं, ज्या अर्थानी ते होत..!!
तो: अर्थ काढणं सुरु होत तेव्हाच clr करायचं होतंस..!!

ती: तेव्हा..!! दोघही पराकोटीच्या मन:स्थितीत होतो..!! माझं ऐकायला तू आणि तुझं मी तयार नव्हतो आपण..!!
तो: तेव्हाच,सोड..!! आता तुझ्या भावनांना की समजू, आवडणं कि प्रेम..!!

ती: तू आवडतो मला..!!
तो: मलाही तू..!!

नंतर दिघेही शांत...











प्रेम व्यक्त करताना २२

“का बोलतोस तू माझ्याशी..??”,न राहवून तिनी विचारलंच.

“बोलतो..!!”, थोडा सौम्य आवाज करून तो फक्त हेच म्हणाला.

“तेच, का बोलतो..??”,ती.

“आवडते मला तुझ्याशी बोलायला..!!”,तो.

“पण बोलतो कुठे तू? ऐकतो फक्त, बोलत तर फक्त मीच असते..!!”, ती

“आवडते तुला ऐकायला”, तो तेच वाक्य शब्द बदलून बोलला..!!

“तेच, का ऐकतो..?? का..?”, ती चिडली होती.

“ऐकतो.”, तो थोड्या गंभीर आवाजात, का चे उत्तर त्याच्याजवळ नव्हते, म्हणून तो पुढे काहीही बोलला नाही.

ती पण काही बोलत नव्हती, त्याच्या साठीच्या भावनांमुळे ती संभ्रमात होती! त्याच्या सोबत बोलायला तर आवडतं होत, पण यात तिच्या भावनांची तारांबळ उडायची,कधी वाटायचे ‘चूक नाही ह्यात’, क्षणात आपण चुकतोय, ही शंका चुकचुकायाची..!

दोघांमधल्या काही क्षणाच्या शांततेचा भंग करत. तो म्हणाला, “का बोलतो? का ऐकतो? हे सर्व शुल्लक प्रश्न नाही का वाटत तुला!! आपण बोलतो, सांगतो एकमेकांना आपले अनुभव, भावना ह्यात काय वावग आहे..?? ह्या प्रश्नाच्या मागे धावून तुझ्याही आणि माझ्याही भावनांची धांदल उडवली आहे..!! त्या पेक्षा जे चाललंय ते चालू दे..!! काही झालं का..?? काही problem असेल तर तसं सांग..!!”

ती, “मला फक्त भीती आहे..!! तुझी सवय झाली तर..!! हे खूप कठीण होऊन जाईल मला..!!!”

तो, “तुला माझी सवय होणार नाही, याची खात्री मी देतो.. आता हा topic बंद का..!!”


सवय मोडायची सवय करावी लागणार हे मनोमनी स्वत:लाच सांगत, चेहऱ्यावरचे चिंतेच सावट दूर करण्यासाठी ती किंचित हसली..!!

Friday, 2 May 2014

प्रेम व्यक्त करताना २१

"तुला कसं कळाल तू त्याच्या प्रेमात पडलीस ते..??" प्रिया साराला कुतूहलाने विचारत होती, "तुला काय वेगळ जाणवलं, जेव्हा तुला कळाले कि तुला तो आवडतो..?? तू त्याच्यावर प्रेम करते..?" प्रियाचे प्रश्न शांततेनी ऐकण्याशिवाय सारा दुसरे काही करूही शकत नव्हती..!!


“शांत हो आधी..!! तुझ्या या प्रश्नांची नेमकी काय उत्तरे तुला अपेक्षित आहे, हे मला समजत नाही आहे..!!”, सारा.


“अग..!! म्हणजे,  तुझ्या स्वप्नात वैगेरे येतो तो..?? कि, सर्वीकडे तुला तोच दिसतो..?? कि, तू फक्त त्याचा आणि त्याचाच विचार करते..?? कि, तू त्याच्या फोन ची डोळे लावून वाट बघते..?? कि, त्याला भेटण्यासाठी कारणे शोधते..?? कि, तुला सर्वीकडे तो फक्त तोच हवा असतो..??” प्रिया नि प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली. “सांग ना नेमके काय वाटले आणि तू ठरवलस कि तू प्रेमात पडली. कुणाच्याही एकदम प्रेमात पडण्यासारखी तू नाहीस ना..!! म्हणून विचारतेय मी..!!”, आता प्रियाचा सूर लडिवाळ पणाचा झाला होता..!!


“हे जे तू सर्व सांगितलं ते झालं किंवा होत असेल तरच प्रेमात पडलोय असा अर्थ होतो का..??” सारानी प्रतिप्रश्न केला..


“म्हणजे..??”, प्रिया पुरती गोंधळली..!!


“म्हणजे, तू जे म्हणाली ना स्वप्नात येतो वैगेरे, तेच जर प्रेम असेल तर प्रेमात पडली नाहीये मी..!! आणि प्रेमात पडल्यावर ही जी तू काही सोंगे सांगितली ती मागे लागणार असतील तर अश्या प्रेमात पडायचेही नाहीये मला..!!”, आणि सारा एकदम शांत झाली..!!


“मग तू कशावरून ठरवलस तू प्रेमात आहे ते..??”, प्रिया.


“मला त्यानी स्वातंत्र्य दिलं, आणि प्रेम म्हणजे ही स्वातंत्र्यच..!! आणि तू जे सांगितलं ते तर सरसकट त्याच्या कैद्यासारखेच वागायचे..!! मला वाटते प्रेम असं फक्त त्याच्यात बांधून ठेवणार नसावं..!! प्रेम म्हणजे माझी मी असण्याच स्वातंत्र्य आणि त्याला तो असण्याच स्वातंत्र्य..!! माझ्यावर त्याची बंधने नाहीत, आणि त्याच्यावर माझीही नाहीत..!! मला त्याची तक्रार नाही, त्याला माझी नाही..!! अगदीच टोकाचे सांगायचे झाले तर प्रेम म्हणजे त्याला त्याचा संसार उभारण्याची मुधा आणि मलाही माझ्या संसाराचे स्वातंत्र्य..!!

फक्त तो, त्याची स्वप्ने, त्याची वाट पहाणे, त्याचे विचार ह्याला प्रेम नाही ‘त्याची बाधा’ म्हणावी लागेल..!!” स्वत: ला समजलेला प्रेमाचा थोडाफार अर्थ सारा शब्दांची जुळवाजुळव करून सांगायचा प्रयत्न करत होती..!!



“तुला हे असं, तू सांगितलेलं प्रेम करणारा भेटला..?? त्याला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही..?? आणि तुलाही पण..??”, प्रिया.


“हो, भेटला..!! मी त्याच्यावर प्रेम करते, या पेक्षा कुठली अपेक्षा त्यानी ठेवावी..?? आणि तो मला त्याच्यावर प्रेम करू देतो, सांग मग आता मी आणखी कुठली अपेक्षा त्याकडून ठेवावी..??”, सारा..!!


“सहीच”, प्रिया. “तोही तुझ्या वर प्रेम करतो..??”



“या प्रश्नाचे उत्तर मी कशी देणार..?? आणि हा प्रश्न मी त्याला विचारूही कसा..?? प्रेम म्हणजे स्वातंत्र्य..!! या प्रश्नांनी प्रेमाचा अर्थ बदलेल, आणि ते मला चुकूनही नकोय..!!”, सारा.

“म्हणजे नाही असं उत्तर आहे का..??”, प्रिया.


“”नाही असं नाही, फक्त या प्रश्नाच्या उत्तराची गरज नसनेच म्हणजे प्रेम..” सारा..!!