Thursday, 24 April 2014

प्रेम व्यक्त करताना २०

कोण म्हणत प्रेम एकदाच होत..!!, बहुदा ती पुन्हा प्रेमात पडली होती आणि हे ती त्याला खूप उत्सुकतेने सांगत होती.. “मी पुन्हा प्रेमात पडली रे..!! मला आवडला तो..!!”

आज असं काही ऐकायला मिळेल याची त्याला कल्पनाही नसेल, तो गोंधळला होता खरा! पण गोंधळ लपवून म्हणाला, “मी तर आधीच म्हटलं होत, प्रेम खुपदा होऊ शकते, तुलाच पटत नव्हते ते..!! बर..!! ते सोड, कोण आहे तो..??”,

त्याच्या याच प्रश्नाची ती वाट पहात होती आणि तिला आवडणाऱ्या त्याची कहाणी अगदी भान हरवून सांगायला लागली..!!
तिची बडबड तो ऐकत होता, मध्ये मध्ये ‘अरे वा..!!’, ‘छान’, ‘अच्छा’ अशे प्रतिसाद द्यायला तो विसरत नव्हता..!!

***
नंतर काही दिवसांनी..!!
***

त्या दोघांमध्ये पुन्हा तिला आवडणाऱ्या त्याचा विषय निघाला. तेव्हा त्यानीच तिला विचारले होते, “काय म्हणतो तुझा तो..??”

ती, “अरे, काही नाही आकर्षण होतं ते, तो आधीच committed आहे..!! सोड, त्याचा विषय नको..!!”

तो, “आता आकर्षण का..!! त्या दिवशी तर उड्या मारत होती, आवडला वैगेरे...!! काय झाल..??”

ती, “आकर्षण आणि प्रेम यातला फरक ओळखण्यात चुकली होती, आता होतात माणसांकडून चुका..!!”

तो, “तुला काय माहिती आहे, तो आवडतो सांगितले तेव्हा किती वाईट वाटलं मला,  रडलो मी..!!”

ती, “आईंग..!! रडला..?? तुला काय वाईट वाटलं..?? काही पण बोलायचं म्हणून बोलू नको..!!”

तो, “हो, आता काही पण..!! हवं तर माझ्या मित्राला विचार, देऊ का फोन त्याला,विचारते का..??”

ती, “नाही.. नाही... नको..!! पण तुला का वाईट वाटलं...??”

तो, “तुला propose करणार होतो मी..!! पण तू सांगितलं कि तुला दुसर कुणी आवडलं, मग विचार बदलवला मी..!! सर्व plans केले होते..!!”

आता ती गोंधळली होती,हृदयाचे धडधडने अधिक वाढले होते,तो काय बोलतोय कळत होत पण वळत नव्हतं..!!

ती, “खोटं नको बोलू..!!”

तो, “खोटं काय त्यात!! करणार होतो पण आता नाही करणार..!”

ती, “बस होते ना..!! थांबव आता..!! किती खोटं बोलणार आहेस..??”

तो, “तुला खोट वाटतंय त्याला मी काय करू..?? हवं तर सर्व plans सांगू..?? काय काय करणार होतो सांगू..??”

ती, “नाही काही नको सांगू..!! फक्त तू खोटा बोलतोय,इतकच म्हण एकदा..!!”

तो, “अरे..!! पण मी खोटं बोलतच नाही आहे ना..!!”

तिच्या भावनांची मात्र पूर्ण धांदल उडाली होती.

ती, “उद्या भेट तू मला, तेव्हा direct बोलू..!!”

तो, “हो, भेटतो..!!”

ती, “हम्म..!!”

तो, “तसं तर मी पुन्हा प्रो नव्हतो करणार पण उद्या भेटतोच आहे तर..” त्याचे वाक्य अर्धे तोडीत,

ती, “तर.. काय तर..?? आधी भेटायला यायचा तसाच ये..!!”

तो, “ मी उद्या विचारणार आहे तुला, विचार करून ठेव.. आजची रात्र आहे तुझ्या जवळ..!!”

ती शांतच.. खूप शांत..

तो, “ठीक आहे न..?”

ती, “ नाही, काहीच ठीक नाही आहे..!!”

तो, “तुला रात्रही कशाला पाहिजे, आत्ताच सांग ‘हो’ कि ‘नाही’ ते..!!”

ती, “नाही..!!” आणि न पानवताच डोळ्यातून गळणाऱ्या आसवाकडे समोरच्या आरशात खिन्न पाहत राहिली..

तीच नाही ऐकून, तो, “विचार कर बर एकदा..!!”

ती, “नाही.!!”

तो, “नक्की न..!!”

ती, “हो..!! नक्की नाही.!!”

तो, “ठीक आहे..!!”

ती, “ ऐक न..!! फक्त एकदा माझ्यासाठी म्हण तू सर्व खोटे बोललास..!! मुळात तू काही बोलालच नाहीस, मी काही ऐकलेच नाही..!!”

तो, “अरे seriously घेऊ नको मला.. मी मज्जाक करत होतो, गंमत होती ती..!!!”

तेव्हा नि:श्वास टाकून तिनी cl ठेवला खरा..!! पण त्यानंतरची ती रात्र, त्यानंतरचे भेटणे सर्व संदर्भच बदलले होते दोघांत, त्याच्या साठी नाही कदाचित पण तिला ही मज्जाक भारी पडली..!! अगदी आयुष्य बदलून टाकेपर्यंत..!

तिची ही गोष्ट लिहिताना मलाही खूप प्रश्न पडले, तिनी तेव्हा “हो” म्हटलेच असते तर..!! तर त्यानी काय केले असते...?? तेव्हाच्या तिच्या भावनांची कदर तो करू शकला असता..?? अशी जीवघेणी मज्जाक कुणी कुणासोबत कशी करू शकते..?? प्रेमाचा विषय असा गंमत म्हणून घेण्यानी त्याला तरी काय मिळालं असेल..??


Wednesday, 23 April 2014

प्रेम व्यक्त करताना १९

तो: काय आवडलं माझ्यातलं तुला..??
ती: तू विचारलं आणि सांगितलंच मी..!!

तो: आवडतो हे माहित आहे ना आता, मग दे सांगून..!!
ती: खर तर तू न आवडून आवडतो..!!

तो: काय होत हे..??
ती: सोड..!! तू समजू शकणार नाहीस..

तो: नाही समजू शकत तर समजव ना मग..
तो: तेच नाही जमत..!!

तो: जमते सर्वच नखरे करते तू..!!
ती: बर..!!

तो: बोल ना आता..!!
तो: स्वत:ची स्तुती ऐकायची आहे का..??

तो: हवं तर तसं समज..!!
ती: मला नाही करायची पण..!!

तो: किती भाव खाशील..??
ती: संगतीचा परिणाम पडतोच..

तो: शेवटचे विचारतोय..!! का आवडलो मी..?? काय आवडलं माझ्यातलं तुला..?
ती: मला नाही सांगता येणार..!!

तो: का नाही..??
ती: जस प्रेम म्हणजे काय याचे उत्तर सापडत नाही, तसाच आहे हा तुझा प्रश्न..!!

तो: हे बघ..!! प्रेम म्हणजे तुला माझ्या बद्दल जे वाटत होते ते नाही हे नक्की..! प्रेम हे अस नसत..!!
ती: तेच म्हणते आहे मी, प्रेम काय नसत हेच आजपर्यंत सांगितलं आहेस तू..!! कधीच प्रेम काय असतं हे बोलला नाहीस..!! जेव्हा प्रेम काय असते हे सांगशील तेव्हा मीही तू का आवडला हे सांगेल..!!

तो: प्रेम जे काही आहे ते शब्दात नाही सांगता येत, मुळात मी एवढा मोठा नाहीच जे प्रेम काय असते हे सांगू शकेल..!!
ती: अगदी तसच तुझ्याही प्रश्नाच उत्तर मला नाही देता येत..!! कारण काय आवडल याचा विचार करून तू आवडला नाहीसच..!!

नंतर दोघेही शांत..!!



प्रेम व्यक्त करताना १८

बीप..!!  
मोबाईल वाजला..!!

वाचत असलेली कादंबरी बाजूला ठेवून तिनी आलेला msg बघितला..!!

“तुझी कालची पोस्ट वाचली, आधीपेक्षा खूप चांगलं लिहायला लागली तू..!! खूप मोठा बदल झाला आहे लिहिण्यात. छान लिहिलंस, आवडली कविता..”

स्नेहा चा msg होता..!! कुणी आपल्या लिहिण्याबद्दल स्तुती केली कि आनंदच होतो, तिलाही झाला..!! “THANK U..!!” तिनी reply केला..!!

“चांगली लिहयला लागली..??” स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारत होती.

“इतका बदल का पण..??” पुन्हा स्वत:लाच प्रश्न..!!

उत्तर तिला माहिती होते, ते उत्तर आपण चांगलं लिहायच कारण असावं हे आवडत नव्हतं..!!

“खरच फक्त त्याच्या मुळे मी चांगली लिहयला लागली..!!” हा विचार डोक्यात आला आणि डोळे बंद करून हा विचार डोक्यातून घालवायचा प्रयत्न केला, पण उलट त्याच्याच विचारांची शृंखला बनत गेली..!!

“काय लिहिलंय हे ‘राधा झाली’,’ रात्र होती’ वैगेरे हे असं काही वाचत नसतो मी” तो एकदा म्हणाला होता..!!

तेव्हा रागात रागात “तुला कुणी वाचायला सांगितलं नको ना वाचू..” म्हणून ती मोकळी झाली.
 पण तेव्हा ठरवले होते चांगले लिहायचे त्यानी ‘वा..!! क्या बात है..!!’ म्हटलंच पाहिजे.

नंतर खूप कविता लिहिल्या, प्रत्येकीत ‘तो’ होता..! 

एकदा तिने त्याला विचारलेही होते, “वाचतो कि नाही, माझ्या कविता...??” तेव्हा तो म्हणाला होता, “तू काही लिहिणार आणि मी वाचणार नाही असं होईल का..?? वाचत असतो..!!” तेव्हा तो वाचतो ह्याच आनंदात तिची कविता सजली होती..!!

पण मनोमनी खूप वाटत होते, त्यांनी एखादी कविता आवडली हे स्वत: होऊन म्हणावे..!! त्याच्यासाठी तिची कविता आणखीनच समजूतदार झाली. कवितेतल्या ‘तो’च्या ऐवजी कवितेत ‘ती’ स्वत: आली..!! आणि त्या कवितेसाठी त्याचा मेल आला,

“मस्त..!! खूप सुंदर कविता..!! आतापर्यंतची बेस्ट..!!”

त्या दिवशी तिला आकाश ठेंगणे झाले होते, डोळे मिटलेल्या तिच्या चेहऱ्यावर सर्व आठवून आजही हसू उमटलं..!!

आणि आपल्या लिहिण्याचे कारण कुणी दुसर असावं, याचा रागही आला..!! पण त्याच्या न आवडण्यामुळे ती जास्त प्रगत आणि समजूतदार झाली हे मोठ सत्य होत..!!

अन त्या साठी तिला त्याचे आधार मानायचे होते..! प्रेमातला नकार आणि कवितेतला नकार या दोन्ही साठी खूप आधार मानायचे होते, आणि ते कवितेतूनच करू शकते म्हणून तीनी कविता लिहिण्यासाठी पेन आणि डायरी हातात घेतली..!!

Thursday, 17 April 2014

प्रेम व्यक्त करताना १७

तो: प्रेमाची भिक मागतेय आहे का तू..??
तो: भिक..!! तसही समजू शकतोस तू..??

तो: याला प्रेम म्हणता येणार नाही; हे माहिती आहे ना तुला..??
ती: मला फक्त तुझ्यातून बाहेर पडयचे आहे, हे समजलंय ना तुला..??

तो: त्या साठी हाच मार्ग योग्य वाटतोय का तुला..??
ती: मार्ग..!! (हसून) दुसरा कुठला उपाय सापडलाय का तुला..??

तो: हो..!!
ती: कुठला तो..??

तो: माझ्या शब्दांना अर्थच नाही असं समज..!!
ती: समजण्यानीच वादळे उठलीत ही सर्व हेही तू समज ना..!!

तो: डोक्यात चालली तू माझ्या..!!
ती: हृदयात जायच्या आधी उखडून फेकून दे..!!

तो: शब्दांवर का जातेस नेहमी तू..??
ती: कमीत कमी हे तरी विचारू नये तू..!!

तो: ठीक आहे, तू म्हणत आहे तर एवढ मी करतो..!!
ती: खोटेपणा किंचितही दिसू देशील नको..!!

तो: पूर्ण प्रयत्न करतो..!!
ती: फक्त हा विश्वास बसवून दे कि तू खरच प्रेम करतो..!!

तो:नंतर काय करशील तू..??
ती:बदलून जाईल पूर्ण, प्रेम हा विषयच बंद करेल..!!

तो: जमेल तुला..??
ती: काय ओळखलस तू मला..??


.... नंतर दोघेही शांत..!!

Tuesday, 15 April 2014

प्रेम व्यक्त करताना १६


“इतकी मोठी नादानी मी बेहोष असतानाही करू शकत नाही, मग पूर्ण शुद्धीवर असताना त्याच्या माझ्या साठीच्या भावना माहितीही न करता मी माझं प्रेम व्यक्त करण,  कस शक्य आहे..?? हा प्रश्न माझी मन:स्थिती पूर्ण ढवळून टाकतो, या द्विधा मन:स्थितीत मला धड आयुष्यात स्थिरही होता येत नाहीये किंवा त्याचा नकार स्वीकारून पुढे जगताही येत नाही आहे..!! "माझ्या सद्य स्थितीला मी पूर्ण जबाबदार नाही..!! तुही ही पूर्ण दोषी नाहीसच..!! चुकालोत दोघेही...!! पण माझा गुन्हेगार तर तू आहेसच ना..!! मला आधीची मी परत मिळणे अशक्य आहे, तुला शिक्षा म्हणून मलाच मी परत मागणेही चुकीचे आहे..!!

"प्रेमाच्या जखमा प्रेमानीच भरल्या जातात, ज्या गंमतीने ह्या प्रेमाची सुरवात केली त्याच खोट्या प्रेमाला एकदा ह्याच गमतीच्या खोट्या प्रेमानीच शेवट कर..!!

"करू शकशील..?? तूला जे वाटत नाही तेच तुला बोलायचं आहे..!! नसलं तरी तुला प्रेम व्यक्त करायचं आहे.! आवडते मी तुला हे मलाच पटवून द्यायचे आहे.. (हे सर्व खोटं असेल कारण तुला तस काहीही वाटत नसेल..!! पण त्यातला खोटेपणा खरा करायचा आहे..!!)

"जमेल तुला..?? जमेल तसं तर नाटकी आहे तू..!! हे सर्व केल्यावर मला जुनी मी मिळणार नाही, पण तुझ्या याच शब्दांनी एक नवी मी मात्र जन्म नक्की घेईल..!! "त्यानंतर तू माझा गुन्हेगार नसशील, तू माझा कुणीच नसशील..!! त्यानंतर मी तुला काहीही मागणार नाही..!! मी निघून जाईल आल्या पावलासरशीच..!! त्यानंतर माझ्या प्रत्येक परिस्थितीला फक्त मी आणि मीच जबाबदार असेल..!! त्यानंतर बदललेल्या माझा आणि तुझा काहीही संबंध नसेल..!!

"बघ विचार कर, तुझी शिक्षा काय ते सांगितलं आहे मी, थोडी कठीण आहे खरी, पण जमल तर पूर्ण कर.. मला मुक्त कर तुझ्या प्रत्येक विचारातून..!! माझी थोडी जरी काळजी असेल तुला तर एवढ कर..!! 

"विनंती नाहीये हे लक्षात ठेव, आव्हान आहे..!!

"सोपं नसेल पण अशक्य ही नाहीये..!!” 

आपल्या डायरीतल हे पान आणखी किती दिवस असच वाचव लागेल..?? हा प्रश्न प्रत्येकदा तिला डायरीची पाने चाचपडताना  पडायचा..!! 

Saturday, 12 April 2014

प्रेम व्यक्त करताना १५

काय ठरवलंय मग तू..?? दोन दिवसापासून वाट पाहतोय मी तुला भेटायची..! भेटायला आल्या-आल्या रवी त्याची नाराजी व्यक्त करत होता..

“नाही रे रवी..!! इतका मोठा निर्णय मला सहजासहजी नाही जमणार.!!”, स्वाती शब्दांची जुळवाजुळव करून बोलत होती..!!

“का नाही..?? विश्वास नाही माझ्यावर..?? कि प्रेम संपल माझ्यावरचे..??” त्याच्या बोलण्यातून राग स्पष्ट दिसत होता..

“घरचे आपल्या लग्नाला तयार होणार नाहीत, हे आपण दोघांनी ठरवलंय- घरच्यांनाही न विचारता..!! आपण हे ठरवतोय कारण आपण आपल्या घरच्यांना ओळखतो; त्यांचे स्वभाव, तत्व आणि संस्कार आपल्याला माहिती आहे. म्हणून आपण ठरवतोय कि पळून जाऊन लग्न करूयात..! बरोबर..??”

“पण खरच सांग तुला योग्य वाटतोय का आपला निर्णय..?? पटतंय का आपलं पळून जाणं..?? मला हा भ्याडपणा वाटतोय.. मला वाटतय आपण एकदा घरच्यांशी बोलायला हवंय..!! त्यांना नाहीच पटणार पण त्यांना विश्वासात घ्यायला काय हरकत आहे..!!”

“आपण पळून जाऊ..!! लग्न करू..!! काही दिवस गोडी-गुलाबीनी राहू.!! पण घरच्यांना न सांगता किंवा घरच्यांना विश्वासात न घेता आपण संसार उभारलाय ही गोस्ट आपल्याला समाधानाने जगू देईल..??”

“आपल्याला पंचवीस-तीस वर्ष सांभाळणाऱ्या आई-बाबांवर आपल्या या निर्णयाने का बितेल हा तरी विचार केलास का..?? आज समजून-उमजून घरच्यांना पटवून आपलं लग्न होण्याची काही तरी शक्यता आहे..!!पण जर त्यांना अंधारात ठेवून आपण लग्न केलं तर ते आपले चेहरेही मरेस्तोवर पाहणार नाही, हे तरी माहिती आहे ना तुला..??”

“मी तुझ्यावर आजही प्रेम करते सोन्या..!! पण तुझ्या सोबत पळून जाऊन लग्नाचा निर्णय घेण मला काही पटत नाही आहे..!! मी काय बोलतीये हे समजतंय का तुला..?? एकदा घरच्यांशी बोलूयात का मग आपण..??” रवीचा हात हातात घेऊन ती त्याला समजावत होती..

“तुझं बरोबर आहे स्वाती, उगच जोश मध्ये निर्णय घेत होतो मी..!! आणि काही कारण नसताना चिडलो तुझ्या वर..!! sorry..!!”, तो अगदी प्रामाणिकपणे त्याची चूक काबुल करून बोलला..!!

“ठरलं तर मग..!! मी हळूहळू आईशी बोलते, तू पण घरी बोल..!! स्वीकारतील रे ते आपल प्रेम..!”, ती आनंदून बोलत होती..!!


तिच्या उत्साही चेहऱ्याकडे बघून रवी ही आनंदी झाला होता..!!

प्रेम व्यक्त करताना १४

ती:  आज तुझी नजर खूप वेगळ बोलली, असं का..??
तो:  काय वेगळ..??

ती: प्रश्नच विचारणार आहेस कि कधी उत्तरेही मिळतील..??
तो: प्रश्नच विचारणार..!!

ती: तुझ्या नजरेनी आज माझ्या शंकांना प्रश्नांमध्ये बदलवलय, असं का..??
तो:  असं का वाटल तुला..??

ती: आधी तुझी तक्रार असायची, मी इकडे-तिकडे बघत बोलते म्हणून, पण आज तू..??
तो: मी काय..??

ती: तू एकही शब्द सरळ नजरेला नजर देऊन बोलला नाहीस..!
तो: इतकी माझी नजर शोधत होतीस तू..??

ती:  हो..!!
तो: का.??

ती: माझ्या शंकांचे निरसण शोधत होती मी..!
तो: माझी नजर सांगते तुला असं काही..??

ती: निरासण सांगत नाही, शंकाच दूर करते..!!
तो: आज नाही झालं असं..??

ती: नाही ना..!! आज तुझ्या नजरेनी शंकेचे प्रश्नात रुपांतर केलेत..!! आता भीती आहे प्रश्नांचे उत्तर
शोधताना नजरेन धोका देऊ नये..!!
तो: असं नाही होणार कधी, शंका काय होती तुझी..??

ती: होती एक.!!
तो:तेच विचारतोय, काय होती..??

ती: प्रेमात पडलाय कधी..??
तो: प्रेम काय असतं, सांग आधी..??

...... ...
नंतर दोघेही शांत

Friday, 11 April 2014

प्रेम व्यक्त करताना १३

“मी आजही विचार करते. मी स्पष्ट त्याच्या बद्दल सांगितले, तेव्हा नेमके तुझ्या मनात काय आले असेल..!! तरीही तू मला का स्वीकारलस..! आपल्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झालीत आणि लग्नानंतर मी तुझ्याशीच नेहमी प्रामाणिक होती, हे जेवढे सत्य आहे तितकेच हेही कि मी माझं पाहिलं प्रेम विसरू शकली नाही. आणि तुलाही मी या गोष्टी पासून अनभिज्ञ ठेवले नाही. सांग ना का स्वीकारलस मला..?? मी जशी आहे तशी स्वीकारणारा तू मला लग्नाच्या इतक्या वर्षा नंतरही मात्र अनोळखीच आहेस का..?”, का जाने रमा ला आज बुचकळ्यात पडल्या सारखा भास झाला म्हणून ती राजेश शी बोलत होती..

“का झालेल्या गोष्टीत रमतेस रमा..!! तू त्याला विसरली नाहीस आणि हे तू कधीच लपवले नाहीस हेच मी तुला स्वीकारण्या मागचे मोठ कारण आहे. जी मुलगी खोटे पणावर नात न बांधता आधीच सर्व स्पष्ट सांगते तीच माझ्या साठी अगदी योग्य राहील हे मला तेव्हा समजत होते आणि म्हणूनच मी तुझ्याशी लग्नाला होकार दिलं. आणि बघ चाललाय ना संसार सुरळीत..!!”

“आज त्याचा वाढदिवस आहे म्हणून आठवण झालीय का तुला..? हव असेल तर call करून बोल त्याच्याशी, बर वाटेल तुला..!!”,तो.

“फक्त आठवण आली, आठवणी येतात त्या आणल्या जात नाही. call वैगेरे करण्या एवढी उतावीळ झाली नाही मी..!! तेव्हाही आणि आजही तू माझ्यावर विश्वास का दाखवतोस..??”,ती.

“कारण मी तुझ्या प्रामाणिकपणाच्या प्रेमात पडलो होतो आणि प्रेम विश्वासावर टिकत हे तरी मला माहित आहे..! मी विश्वास ठेवला आणि तो सार्थकी गेला यात मी आयुष्य मिळवलं..!!”, तो शांत बोलत होता.

“मी त्याची आठवण काढून तुला दुखावले का रे..?”, राजेश गंभीर झाल्यासारखा वाटल्याने रमाने विचारले.

“नाही, नाही. तुझ मन समजतो मी..”

“ तू मला त्याच्या आधी का नाही भेटलास..?? मी तुझ्यावर खरच मनापासून खूप प्रेम करते. प्रेम पुन्हा करता येत रे, पण पहिल्या प्रेमाच्या गाठी मनात घट्ट घर करून असतात..!!”,ती.

“ती गाठ सैल पडून सुटण्याएवढ प्रेम करायला अजून काही वर्ष सोबत आहोत आपण..!!”, तो.

“I am Sorry..!”,ती.

“Don’t Be.. तू कुठेही चुकलेली नाहीस.. तुझी कर्तव्ये नेहमीच पूर्ण केलीस.. आणि आत्ताच बोललीस ना तू कि माझ्यावर प्रेम करतेस.. आणखी काहीही नकोय मला.!”,तो.


हे ऐकल्यावर डोळ्यातले अश्रू लपवण्यासाठी ती त्याच्या मिठीत शिरली..!

प्रेम व्यक्त करताना १२

“नेहमी सारखाच माझा कल्याण ते दादर लोकल चा प्रवास सुरु होता. अगदी रोज प्रमाणे खांद्यावर Laptop ची जड bag,कानात सवयीने वाजणारे मोबाईल मधील गाणे, चेहऱ्यावर तणाव,आजूबाजूची बरीचशी अनोळखीच पण ओळखीचे झालेले चेहरे, सर्व खूप सवयीचे होत..!! फक्त ती सोडली तर...!!

लोकल Platform वर लागली आणि माझ्याच सारख्या सकाळी कामाला जायच्या घाईतल्या गर्दीच्या प्रवाहात मी आत चडलो. आणि ती दिसली, ती खिडकी जवळ बसलेली..

“‘Love at first sight’  म्हणतात ते मी तेव्हा अनुभवलं. तिच्या बाजूला कुणी तिचा मित्र असेल, बाहेर बघत आणि चेहऱ्यावर सौम्य हसत ती त्याच्याशी बोलत होती..

“दिवस संपला तरीही सकाळी मला दिसलेली ती जशीच्या तशी आठवते. काळसर लाल रंगाचा साधा कुर्ता, चुनरीची लाल ओढणी,कपाळावर चंद्रकोर,गव्हाळी रंग आणि वर बांधलेले तिचे केस. तिला बघितल्यावर फक्त बघतच रहावे अशे वाटत होते, वाऱ्याने उडणारे केस हलकेच सावरताना ती खूप निरागस दिसत होती. बोलताना तिच्या मनातला प्रत्येक भाव स्पष्ट चेहऱ्यावर दिसत होता.

“‘पुढील स्टेशन दादर’ या आवाजानी माझी तंद्री तुटली, इतका वेळ मी वेड्यासारखा तिला बघत होतो. मला खरच मनोमनी वाटत होते कि ही लोकल थांबूच नये. दादर कधीही येउच नये, मी कुठेही उतरू नये, ती कधीही माझ्या नजरे समोरून दुरावू नये.

“पण या विचारा-विचारात मी कधीच गर्दी सोबत खाली उतरलो होतो.

“पहिल्याच नजरेत समुद्र आवडला म्हणजे समुद्र आपला होत नाही किंवा आपणही समुद्राचे होत नाही. ती दिसली, आवडली, तिचे नाव-गाव कशाचाही थांगपत्ता न लागता, ती गेली..!!

“त्या नंतर चा दिवस रोजसारखाच संपला..!!”


शेवटी उद्गारवाचक चिन्ह देऊन श्रींनी Diary बंद केली. रोजच्या धकाधकीच्या जीवनात, भर उन्हाळ्यात पहिल्या सरींचा आनंद घ्यावा ह्या उल्हासात तो अंथरुणात पडला..!!

प्रेम व्यक्त करताना ११

"वाईट वाटते म्हणे..!! माणूस आहेस ना तू..?? वाईट वाटणारच पण कित पर्यंत या गोष्टीचा विचार करून स्वत:ला बरबाद करायचे ते तुला ठरवायचे आहे...

तू मला कधीही सांगितले नसले तरीही, आई आहे मी तुझी, तुझ्या डोक्यात काय चाललंय हे एखाद्या वेळी मला कळणार नाही पण तुझ्या मनात चाललेली घालमेल मला कधीच समजली होती. तुझ्यात झालेले बदल कळण्या एवढी तरी मी तुझ्याशी जुळली आहे..”

“बघ मनू..!! तुझ्या अगदी मनासारखा हवा तो जॉब मिळाल्यावरही तू चक्क पुण्याला जावे लागते म्हणून नाकारले तेव्हाच मला कळाले होते कि काही तरी बिनसलंय, काही तरी पुण्यात टाळते आहेस तू, नाही तर हव ते मिळूनही घरी बसणाऱ्या पैकी तू नाहीस.. का नाही करायचा जॉब या प्रश्नाला किती पोकळ उत्तर दिलं होतास तेव्हा, कि मला घरी राहायचं आहे,बाहेर बाहेर राहून कंटाळा आला, बाकी लोकांनी ठेवलाही विश्वास पण मी कसा ठेवू सांग.?? कारण घरात जीव गुदमरतो तुझा, हे मला माहित आहे..!!”

“दिवाळी सारखा सण असूनही कोण तो पोरगा त्याचा एक call नाही आला म्हणून तू इतकी उदास झालीस.. घरी चाललेली तयारी, इतक्या वर्षानंतर तू दिवाळी साठी घरी आहे हे सर्व तुला काहीच महत्वाच नाही..?? असा रडवेला चेहरा करून घरचे वातावरण बदलवताना मी तुला या आधी कधीच पहिले नाही.. उलट तू घरी आलीस कि उत्साह असायचा नेहमी, कुठे गेली ती माझी मुलगी..??”

  “कुणी आवडल्यानी इतका फरक पडतो..?? कुणाच्या प्रेमात पडल्यानी खरच तू स्वत:ला ही विसरलीस का..? पुण्यात गेल्यावर तो आठवतो म्हणून घरी बसने हे कितपत योग्य आहे..?? सर्व मैत्रिणी सोबत उनाडक्या करत फिरणारी तू त्यांचे call दुर्लक्षित कशी करू शकते..??
तु मला त्याच्या बद्दल बऱ्याच उशिरा सांगितलस याच काहीही वाटत नाही आहे मला.. पण तुझी कवडीचीही काळजी न करणाऱ्या त्याच्या मुळे तू स्वत:ला बदलवण आणि घरात स्वत:ला कोंडून ठेवण या सर्वांमुळे मला जास्त वाईट वाटत आहे..!!”

“आणि माझा कुणावर प्रेम करण या गोष्टीला विरोध नाही, पण तुला जो आवडला तो तुला तू आहे तशी स्वीकारायला तयार आहे का..?? नाही ना..?? तो तरी तुला आहे तसा चालेल का...??”

“मला उत्तर देण्यापेक्षा तू स्वत:लाच उत्तर दे..!!”
“आणि खरच सांगू तो तुला आवडतो ना, यात काहीही चूक नाही आहे उलटं तुझ्यात संवेदना जिवंत आहे हे सिद्ध झालंय, मी तुला तुझ्या एका मित्राच्या मृत्युनंतर कोसळताना पाहिलंय. पण तेव्हा तू दोन दिवसात  सावरली होतीस, तेव्हा कुठून बळ मिळवून कठोर झाली होतीस, तशीच हो न एकदा पुन्हा..!”

“मी तुला त्याच्याशी बोलूच नको असे म्हणत नाही आहे, फक्त प्रेम ही भावना मनातून बाजूला ठेवून बोल.. आवडतो तो हे विसरून बोल.. जो मित्र तुला हरवल्या सारखा वाटतोय तो सापडतो कि नाही बघ..”

मनुनी सागर आवडतो हे दिवाळीच्या दिवशी आईला न राहवून सांगितलं. घरात इतका कामाचा व्याप पडला असूनही रडणाऱ्या आपल्या बाळाला मांडीवर घेवून आई तिची समजूत काडत होती..!! मनूच्या गालावर ओघळणारा आणि स्वत:च्याही डोळ्यातले अश्रू नेहमी नेहमी पुसत होती..

आईच्या मांडीवर पडून मनू खरतरं सागरचे मनोमनी आभार मानत होती. त्याच्यामुळेच तीन-चार वर्षापासूनची तिची आणि तिच्या आईतली दरी कमी झाली होती.. निर्मळ प्रेमाचा एक खराखुरा अनुभव ती घेत होती..
त्याच्या जायज नकारामुळे ती स्वावलंबी झाली होती..ती स्वत:ला जास्त ओळखायला लागली होती.. ही दिवाळी तिच्या साठी खूप नवीन स्वप्ने घेऊन आली होती..!!



Monday, 7 April 2014

प्रेम व्यक्त करताना १०

तो: हे तरी कळतय ना गं तुला..??
ती: तू का रे असा भावनिक करतो मला..??

तो: तुझ्या मनातलं ओठांवर आणतोय फक्त..!!
ती: काही भावनांना राहू दे अव्यक्त..!!

तो: बोलली नाहीस तर त्रास तुलाच..!!
ती: जे बोलायचे ते मौनानेच समजेल तुलाच..!!

तो: कशाला फालतू कवितांचा संसार मांडलास तू..??
ती: मी तुझ्या पर्यंत संपूर्ण पोहचावी हाच हेतू..!!

तो: श्या, भलतच Dramatic होतंय हे..!!
ती: टाळायलाही जमत नाही आहे हे...!!

तो: बघतो..!! विचार करतो..!! नंतर ठरवू..!!
ती: ठीक आहे, तुझी इच्छा, मग मी वाट पाहू..??

तो: किती दिवस थांबशील.?? जन्मभर जमेल..??
ती: तू नक्की येणार असशील तर तेही करेल..!!

तो: इतका विश्वास आहे..??
ती: स्वत: पेक्षाही जास्त आहे..!!

तो: बापरे..!! जड-जड वाटतय मला..!!
ती: नशीब माझे काही तरी वाटतंय तुला..!!

तो: वाटतंय बरच काही..
ती: पण माझ्यासारखे बोलू शकणार नाही..!!

तो: तुला सर्वच समजते..!!
ती: आणि मी कुठे ते नाकारते..!!

तो: मग मला मागे ठेवून, पुठे जा निघून..!!
ती: तेही केलं असतंच; पण तुझ्या काळजीने येते दाटून..!!

तो: माझी काळजी कशाची..??
ती: माझ्या शिवाय राहू शकशील तू याची..??

नंतर दोघेही शांत.....