Friday, 11 April 2014

प्रेम व्यक्त करताना १२

“नेहमी सारखाच माझा कल्याण ते दादर लोकल चा प्रवास सुरु होता. अगदी रोज प्रमाणे खांद्यावर Laptop ची जड bag,कानात सवयीने वाजणारे मोबाईल मधील गाणे, चेहऱ्यावर तणाव,आजूबाजूची बरीचशी अनोळखीच पण ओळखीचे झालेले चेहरे, सर्व खूप सवयीचे होत..!! फक्त ती सोडली तर...!!

लोकल Platform वर लागली आणि माझ्याच सारख्या सकाळी कामाला जायच्या घाईतल्या गर्दीच्या प्रवाहात मी आत चडलो. आणि ती दिसली, ती खिडकी जवळ बसलेली..

“‘Love at first sight’  म्हणतात ते मी तेव्हा अनुभवलं. तिच्या बाजूला कुणी तिचा मित्र असेल, बाहेर बघत आणि चेहऱ्यावर सौम्य हसत ती त्याच्याशी बोलत होती..

“दिवस संपला तरीही सकाळी मला दिसलेली ती जशीच्या तशी आठवते. काळसर लाल रंगाचा साधा कुर्ता, चुनरीची लाल ओढणी,कपाळावर चंद्रकोर,गव्हाळी रंग आणि वर बांधलेले तिचे केस. तिला बघितल्यावर फक्त बघतच रहावे अशे वाटत होते, वाऱ्याने उडणारे केस हलकेच सावरताना ती खूप निरागस दिसत होती. बोलताना तिच्या मनातला प्रत्येक भाव स्पष्ट चेहऱ्यावर दिसत होता.

“‘पुढील स्टेशन दादर’ या आवाजानी माझी तंद्री तुटली, इतका वेळ मी वेड्यासारखा तिला बघत होतो. मला खरच मनोमनी वाटत होते कि ही लोकल थांबूच नये. दादर कधीही येउच नये, मी कुठेही उतरू नये, ती कधीही माझ्या नजरे समोरून दुरावू नये.

“पण या विचारा-विचारात मी कधीच गर्दी सोबत खाली उतरलो होतो.

“पहिल्याच नजरेत समुद्र आवडला म्हणजे समुद्र आपला होत नाही किंवा आपणही समुद्राचे होत नाही. ती दिसली, आवडली, तिचे नाव-गाव कशाचाही थांगपत्ता न लागता, ती गेली..!!

“त्या नंतर चा दिवस रोजसारखाच संपला..!!”


शेवटी उद्गारवाचक चिन्ह देऊन श्रींनी Diary बंद केली. रोजच्या धकाधकीच्या जीवनात, भर उन्हाळ्यात पहिल्या सरींचा आनंद घ्यावा ह्या उल्हासात तो अंथरुणात पडला..!!

No comments:

Post a Comment