Friday, 4 April 2014

प्रेम व्यक्त करताना ५

“आठवतय..??,

“एकदा तू ओलावलेल्या डोळ्यांनी, ती किती निष्ठुरतेने निघून गेली; ही कहाणी सांगितली होती. तेव्हा तू मनात कितीतरी भावनांचा कल्लोळ मांडून तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होतास. हे सर्व मला सांगताना, तू एकदाही नजर मिळवली नव्हती. पण तुझ्या डोळ्यात तराळलेले अश्रू मात्र तू लपवू शकत नव्हतास. वाईट वाटत होत ना तेव्हा तुला, इतकं वाईट कि डोळे ओलावले होते..!! डोळ्यात अधांतरी अडकलेल्या पाण्यासारखाच अधांतरी वाटत होतास तू त्या दिवशी..!! तिच्यावर कित्ती निस्सीम प्रेम करतो हे अगदी स्पष्ट दिसत होते..

“मला सर्वात जास्त तूझे डोळे आवडायचे, पण त्या दिवशी तिच्या साठीच प्रेम त्याच डोळ्यात बघितलं आणि कळून चुकल..!! सर्वच..!!

“कदाचित मी तुझ्यावर करते त्या पेक्षा कितीतरी जास्त प्रेम करतोस तू तिच्यावर,खूप जास्त..!! तू तिला सोडताना तिनी एकदा तरी मागे वळून बघावे अशी मनोमनी इच्छा ठेवणारा तू तेवढी माझी इच्छा मात्र ओळखू शकला नाहीस..!! मला खंत किंवा तक्रार काहीही नाही, कारण ज्या प्रेमापोटी तुझ्या डोळ्यात पाणी आलं, जिच्या मुळे तू इतका व्याकूळ झाला,तिच्या एका मागे वळून न पाहण्याने तुझ्यावर काय बितली असेल, हे आज या क्षणाला फक्त मी आणि मीच सांगू शकते..!!

“त्या नंतर खुपदा खोटा बोललास, ती फक्त एक मैत्रीणच आहे म्हणून..!! पण तुझ्या बोलण्यातला आणि डोळ्यातला विरोधाभास मी जाणला होता..!!

“का आठवतेय मी हे सर्व..??

“आज तू असं निघून जाताना, तू एकदा मागे वळून बघावे अशी खूप इच्छा (तुला तिच्या साठी असावी तितकी तीव्र नसेल कदाचित..!!) होती..!! आणि तू काहीही झाले तरी मागे वळून बघणारच नाहीस म्हणून माझ्याही डोळ्यात पाणी आले.. आज आपण दोघंही, थोड्या फार फरकाने.....””


स्वप्नील ची बाईक नजरे आड जाईपर्यंत नम्रता मनात सर्व बोलत होती, तो दिसेनासा झाला आणि तरळलेला अश्रू गालावर ओघळला..!!

No comments:

Post a Comment